
कमल राजाराम वाणी विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२६
प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. युवराज वाणी, सचिव श्री. गोवर्धन पाटील, शिक्षणतज्ज्ञ प्रा. ललिता वाणी, संचालक वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे तसेच मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक व ज्योती बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी महापौर दीपमाला काळे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सादरीकरण पाहून महापौर दीपमाला काळे यांनी त्यांचे कौतुक केले व भविष्यात शास्त्रज्ञ बनण्यासाठी जरूर प्रयत्न करावे असे त्यांना सांगितले. इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वयंपाक घरातील विज्ञान’ ही नाटिका सादर करून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जो है जैसा है वैसा क्यू है’ हे गीत सादर केले. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तू तयार केल्या होत्या, ज्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक लिफ्ट, कुलर, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, न्यूटनचे नियम आणि आम्ल-आम्लारी ओळख अशा विविध प्रयोगांचे थेट सादरीकरण केले. तसेच वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेतूनही आपली कला जोपासली.
महापौरांचे मार्गदर्शन आपल्या भाषणात महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “आजचे युग हे विज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी न धावता कल्पक निर्मितीसाठी देखील प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागील ‘कार्यकारणभाव’ शोधला पाहिजे. अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाची कास धरली तरच आपला आणि देशाचा विकास होईल.”
विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांचे त्यांनी विशेष कौतुक केले. नियोजन व आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना नेहेते व सुवर्णा पोतदार यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उज्ज्वला जाधव यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.




















