जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२५
केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यासाठी 22.5 लाख मेट्रिक टन साखरेचा विक्री कोटा खुला केला आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल 2.5 लाख टनांची कपात झाली आहे.
या अपुऱ्या कोट्याचा परिणाम गुरुवारी घाऊक बाजारातील दरांवर दिसून आला. दर शंभर रुपयांनी वाढून साखरेची किंमत क्विंटलमागे 4200 ते 4250 रुपयांवर पोहोचली. व्यापाऱ्यांच्या मते, मागणी वाढत राहिल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
2024-25 च्या साखर हंगामात उत्पादन 260 ते 262 लाख मेट्रिक टनांवर मर्यादित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडून साखर कोटे कमी प्रमाणात जाहीर केले जात आहेत.
कारखान्यांच्या निविदा देखील प्रति क्विंटल 3750 वरून 3850 रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. श्रावण, राखीपौर्णिमा, स्वातंत्र्यदिन, गोकुळाष्टमी आणि गणेशोत्सव अशा सणासुदीमुळे साखरेच्या मागणीत मोठी वाढ होणार असून, दर आणखी वाढण्याचा इशारा बाजारपेठेतून मिळत आहे.
