जळगाव मिरर | ३० जानेवारी २०२६
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, ती तातडीने भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री पदासह अजित पवारांकडे असलेल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या कोणाकडे सोपवायच्या, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असतानाच सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. शासन आणि पक्षाचे काम थांबून चालणार नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री पदाची जागा तातडीने भरली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. “शो मस्ट गो ऑन” या उक्तीचा उल्लेख करत भुजबळ यांनी प्रशासनाची घडी विस्कटू नये, यासाठी त्वरित निर्णय आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पक्ष हादरून गेला असला, तरी शासनाची जबाबदारी पुढे नेणे गरजेचे आहे, असे भुजबळ म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवावी, असे अनेक आमदारांचे मत असून ते योग्यच वाटते, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शनिवार, ३१ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार असून, सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले तर त्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्याआधी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी महत्त्वाच्या खात्यांचे वाटप लवकर करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ उपमुख्यमंत्री पदापुरतेच नव्हे तर पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरही बदल होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद, तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे समजते. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अजूनही शोकसागरात असतानाच, प्रशासन आणि राजकीय स्थैर्य राखण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत. आता सर्वांचे लक्ष शनिवारी होणाऱ्या आमदारांच्या बैठकीकडे लागले असून, त्यातून राज्याला नवे उपमुख्यमंत्री मिळणार का, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.




















