जळगाव मिरर | २२ एप्रिल २०२४
माझ्या लेकराला आणि मला कोणीतरी मारेल, माझ्यामागे भूत लागले आहे, अशी भीती वाटल्याने महिलेने तिच्या चिमुरड्यासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यात चिमुरड्यासह या महिलेचा मृत्यू झाला. पुणे शहरातील वाकड येथील यमुनानगरमधील रेगलिया सोसायटीत शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल जगदीश आवटे हरिश्चंद्रे (३२) आणि विहान संकेत आवटे (४, रा. वाकड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि संकेत आवटे यांचा २०१८ मध्ये विवाह झाला. त्यानंतर संकेत हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले. त्यावेळी कोमलदेखील पती संकेत यांच्यासोबत अमेरिकेत गेल्या. दरम्यान, कोमल यांना मानसिक आजाराचा त्रास सुरू झाला. मुलगा विहान आणि मला कोणीतरी मारेल, माझ्या मागे भूत लागले आहे, अशी त्यांना भीती वाटायची. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांना मानसिक त्रास सुरूच राहिल्याने त्या दोन दिवसांपूर्वी भारतात परतल्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी संबंधित डॉक्टरांची वेळदेखील घेण्यात आली होती.