जळगाव मिरर | ३ जानेवारी २०२५
राज्यातील पुणे शहरातून नेहमीच गुन्हेगारीच्या घटनेच्या बातम्या सातत्याने येत असतांना पुन्हा एकदा पुणे येथील वाघोली येथील गोरेवस्ती परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुलीशी संपर्क न ठेवण्याची तंबी देऊनही तिच्याशी बोलत असताना पाहिल्यानंतर मुलीच्या वडिलांनी आणि तिच्या भावांनी मिळून अल्पवयीन मुलाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत खून केल्याचा प्रकार घडला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, गणेश वाघू धांडे (वय 17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी मुलीचे वडील आणि तिच्या दोन भावांवर वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. याबाबत खून झालेल्या मुलाचे वडील वाघु धांडे (वय 64, रा. वाघोली, पुणे) यांनी आरोपींविरोधात वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
2 जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गणेश धांडे हा त्याच्या मित्रांसोबत वाघोली येथून गोरवस्ती येथून दुचाकीवर चालला होता. त्या वेळी आरोपींपैकी एकाची मुलगी गणेश धांडे याच्याशी बोलताना त्यांना दिसली होती. यापूर्वीही गणेशला मुलीच्या संपर्कात न राहण्याबाबत सांगितले असतानादेखील तो तिच्याशी बोलताना त्यांना दिसला. त्याचाच राग मनात धरून मुलीच्या वडिलासह तिचा भावांनी मुलाला लोखंडी रॉड व दगड डोक्यात मारून गणेशचा खून केला.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यावर, घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहे. वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या पथकाने आरोपींना तत्काळ अटक केली.