
जळगाव मिरर | २८ फेब्रुवारी २०२५
एनए झालेल्या शेतातील नऊ प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात सहा हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्याला गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या तलाठ्याला ७५ हजार रुपये वेतन असतानाही लाचेचा मोह आवरता आला नाही.
मागील काही महिन्यांत पारोळा तालुक्यात लाचेच्या घटना वाढल्या आहेत. महेशकुमार भाईदास सोनवणे (वय ५०, सजा शेवगे बुद्रुक ता. पारोळा) असे या तलाठ्याचे नाव आहे. एन.ए झालेल्या नऊ प्लॉटवर नोंदी लावण्याच्या कामासाठी तलाठी सोनवणे यांनी प्रत्येकी ११३० रुपये याप्रमाणे १० हजार १७० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सहा हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सापळा लावला.
यांनी केली कारवाई
सदर कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव, श्रीमती स्मिता नवघरे पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. जळगाव, दिनेशसिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक, पो. हे. कॉ. किशोर महाजन, पो.कॉ राकेश दुसाणे, पो.कॉ पोळ यांनी सापळा रचून कारवाई केली.




















