
गुढीपाडव्याच्या उत्साहाला ग्रहण – अपंग व्यक्ती गाड्यांमध्ये अडकल्याने दुर्घटना, गावात शोककळा
जळगाव मिरर | २१ मार्च २०२६
भुसावळ तालुक्यातील गोजोरा गुढीपाडव्याच्या उत्साहात रंगलेल्या गोजोरा गावात श्री मरी मातेच्या यात्रेदरम्यान पारंपरिक ‘बारा गाड्या’ सोहळ्यात दुर्दैवी अपघात घडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदोत्सवाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १९ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास चोरवड-गोजोरा मार्गावर यात्रेनिमित्त ‘बारा गाड्या’ या पारंपरिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी गोजोरा तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात सोहळा रंगात आला असतानाच अचानक ही दुर्दैवी घटना घडली.
अशोक बाबुराव कोळी (वय ५७, रा. गोजोरा) हे सोहळा पाहत असताना गर्दीतून पुढे आले असावेत, अशी प्राथमिक माहिती आहे. एका हाताने अपंग असल्यामुळे त्यांना हालचालीत अडचण येत होती. याच दरम्यान चौथ्या व पाचव्या गाडीच्या मधोमध ते अडकल्याने त्यांच्या अंगावरून गाड्या गेल्या. यात ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर काही काळासाठी सोहळा तात्काळ थांबवण्यात आला. उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत अशोक कोळी यांना बाहेर काढले आणि तातडीने भुसावळ येथे उपचारासाठी हलवले. तेथे डॉ. राजेश मानवतकर यांच्या दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे गोजोरा गावावर शोककळा पसरली असून, यात्रेचा उत्साह क्षणात शोकात बदलला. अशोक कोळी हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे गावाने एक जिव्हाळ्याचा माणूस गमावल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेची नोंद भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे.




















