जळगाव मिरर । १९ सप्टेंबर २०२५
व्हॅन अज्ञात वाहनावर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांसह पाच जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मलकापूर तालुक्यातील चिखली-रणथम परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बुधवारी रात्री ११:४० वाजेच्या सुमारास घडला. ठार झालेल्यांमध्ये भुसावळचे चार तर मुक्ताईनगरातील एकाचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, ठार झालेल्यांमध्ये कारचालक साजीद अजीज बागवान (३०, रा. भुसावळ), झुमा सिखधर (४६), तानिया बागवान (४२, रा. पश्चिम बंगाल, ह. मु भुसावळ), संतोष तेजराव महाले (४०, रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) यांचा समावेश आहे. उर्वरित एका महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींपैकी चौघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे, तर एकाला बुलढाणा येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि नायब तहसीलदार श्रीकृष्ण उगले यांनी रात्री उशिरा घटनास्थळ तसेच उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये पंकज दिलीप गोपाळ (२२, रा. नांद्रा हवेली, ता. जामनेर), दीपिका विश्वास (३०, रा. कोलकाता), टीना अजय पाटील (४५, रा. भुसावळ) आणि एका अज्ञात महिलेचा समावेश आहे. जळगावहून नागपूरच्या दिशेने प्रवास करणारी व्हॅन (एमएच ४६ एक्स ३१२०) समोर चालणाऱ्या दुसऱ्या एका वाहनावर धडकली. या अपघातात वाहनाचा पूर्णतः चुराडा झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.