जळगाव मिरर | २३ जानेवारी २०२६
जळगावकडून भुसावळकडे जाणाऱ्या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही कार महामार्गावरील दुभाजक तोडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर आदळली. या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना नशिराबादजवळील टोल नाक्याजवळ २२ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, जळगावकडून भुसावळकडे जाणारी इनोव्हा कार (एमएच १९, बीयू- ७१८६) चा गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास जळगाव ते भुसावळ महामार्गावरील नशिराबादजवळ भीषण अपघात झाला. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा कारने महामार्गावरील डिव्हायडर तोडत थेट विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या कंटेनर (जीजे ०१, डीएक्स-९४९७) ला जबर धडक दिली. या भीषण अपघातात इनोव्हा कारमध्ये असलेल्या झोया नदीम पठाण (वय २२) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर भुसावळ येथील सोना डेअरीचे संचालक यांचा मुलगा अरबान खान (वय २६) हा गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या अरबान खान यास तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, हा अपघात इतका जबर होता की, यात इनोव्हा कारचा पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातातील दोघे भुसावळ येथील रहिवासी असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस व आपत्कालीन सेवांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण समजले नसून या घटनेचा तपास नशिराबाद पोलीस करत आहेत.




















