जळगाव मिरर | २० जून २०२४
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आताच सुरुवात करावी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र किंवा धनुष्यबाणाचे आमचे चिन्ह न वापरता समोरासमोर यावे. मी लढायला तयार आहे, या भाषेत शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान दिले. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी जुळवून घेण्याचा प्रश्नच येत नाही, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिवसेनेचा (ठाकरे) ५८ वा वर्धापन दिवस बुधवारी षण्मुखानंद सभागृह येथे पार पडला. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे भाजपच्या टीकेला उत्तर दिले. ‘या निवडणुकीत त्यांना शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण या चिन्हाची मदत घेऊनच लढावे लागले.
शिवसेनेचा वारसा प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू होतो, हे सांगताना ठाकरे यांनी प्रत्यक्ष घडलेला किस्सा सांगितला नागपूरच्या कस्तुरचंद पार्क मैदानावर शिवसेनेची शेतकरी आंदोलनाची सभा होती. आदित्य ठाकरे तेव्हा लहान होते. सभेसाठी येणाऱ्या गाड्या आणि माणसे पाहून ते उद्धव ठाकरे यांना म्हणत होते, ‘बाबा, आजची तुझी सभा मोठ्ठी होणार.’ उद्धव यांनी तेव्हा त्यांना सांगितले, ‘ही सभा माझी नाही, तुझ्या आजोबांची आहे.’ मुंबईत आल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभेबाबत विचारले तेव्हा उद्धव यांनी त्यांना आदित्य यांच्याबरोबरचा त्यांचा संवाद सांगितला. तो ऐकताच शिवसेनाप्रमुख उद्धव यांना म्हणाले होते, ‘सभा माझी नाही. तुझ्या आजोबांची आहे!’
