जळगाव मिरर | २१ डिसेंबर २०२५
धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाला जोरदार धक्का बसला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या उमेदवार लिलाबाई सुरेश चौधरी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. लिलाबाई चौधरी यांनी बाजी मारत धरणगाव नगरपालिकेवर ठाकरे गटाची पकड मजबूत केली आहे.
या निवडणुकीत धरणगावमध्ये महायुतीकडून वैशाली भावे या उमेदवार रिंगणात होत्या. मात्र मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत लिलाबाई चौधरी यांनी आघाडी कायम राखत अखेर निर्णायक विजय मिळवला. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार वैशाली भावे यांचा दारुण पराभव झाला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः लक्ष घालूनही अपेक्षित यश मिळू न शकल्याने हा निकाल त्यांच्या नेतृत्वासाठी मोठा धक्का मानला जात आहे. धरणगाव हा पालकमंत्र्यांचा प्रभाव क्षेत्र मानला जात असताना, या ठिकाणी ठाकरे गटाने मिळवलेला विजय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. निकाल जाहीर होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत फटाके फोडले. हा विजय जनतेने दिलेला विश्वास असल्याचे सांगत, लिलाबाई चौधरी यांनी विकासाच्या मुद्द्यावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.





















