जळगाव मिरर | १४ जुलै २०२३
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहभागी झाल्यामुळे महायुती अधिक मजबूत बनली असली तरी नाराजीच्या बातम्या केवळ अफवा आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटातील सहा आमदार लवकरच आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केला.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेकरिता ते अमरावतीत आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सामंत म्हणाले, ‘‘आमदारांना पात्र करायचे की अपात्र हा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा असतो. आमचे आमदार नियमानुसार आमची बाजू मांडतील. विधानसभा अध्यक्षच याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. त्यामुळे आमदार पात्र की अपात्र ठरणार हे सांगण्याचा अधिकार आपला नाही. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देतील, अशी अफवा उद्धव ठाकरे गटाकडून पसरविली जात आहे. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करणार असून पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकासुद्धा त्यांच्याच नेतृत्वात लढविण्यावर भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमत झाल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील मनीषा कायंदे, नीलम गोऱ्हे यांनीसुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गट बिथरल्याचेही सामंत म्हणाले.