जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
जळगाव शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अपघाताच्या नियमित घटना घडत असतांना नुकतेच जळगाव तालुक्यातील विटनेर – जळके दरम्यान एक अपघात झाला असून यात एका १६ वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील चेतन दीपक वराडे (वय १६) हा तरुण मित्र पुष्पल राजाराम गायकवाड (वय २०) याच्या सोबत दि ३ जानेवारी रोजी दुचाकीने लगनाला गेले होते. लग्नकार्य आटोपून दोघेजण घरी जाण्यासाठी निघाले. वावडदे ते विटनेर दरम्यान जळके गावाजवळ त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला. त्यानंतर ती दुभाजकावर आदळून दुभाजकावर लावलेल्या पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली. तसेच तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र पुष्पल हा गंभीर जखमी झाला होता.
अपघात झाल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी दोघांना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी चेतन याची तपासणी करीत त्याला मयत घोषीत केले तर त्याच्या मित्रावर उपचार सुरु आहे. अपघातात चेतनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांनी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चेतनच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.