
जळगाव मिरर | २० मे २०२५
कंपनीतून घरी परतल्यानंतर गौरव कैलास गाढवे (वय १९, रा. नवीपेठ) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १९ रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील नवीपेठ परिसरात गौरव गाढवे हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. एमआयडीसीतील एका इलेक्ट्रीक कंपनीत काम करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. सोमवार दि. १९ रोजी सायंकाळी तो ड्युटीवरुन घरी परतला त्यानंतर त्याने घरातील एका खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.
गौरवची आत्या ही खोलीत गेली असता, त्यांना गौरव हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, कुटुंबियांनी तात्काळ गौरवला खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. गौरवच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















