
जळगाव मिरर / १९ डिसेंबर २०२२
तालुक्यातील मोहाडी गावातुन अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची पोलिसात नोंद असताना दुसऱ्या दिवशी त्या मुलीचा एका विहिरीत मृतदेह आढळून आल्याने गावात प्रचंड खळबळ उडाली होती. मयत तरुणीचे नाव पूजा भीमराव पवार (16, रा. मोहाडी) असे आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मिळालेली माहिती अशी कि, जळगाव येथून जवळ असलेल्या मोहाडीतील पुजा भीमराव पवार ही तरुणी परिवारासह वास्तव्याला होती. १७ डिसेंबर शनिवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात सर्व जण झोपलेले असतांना तरुणी घरातून निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास तरुणीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. अखेर तिच्या कुटुंबियांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतजवळील विहिरीत तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना आढळला.




















