जळगाव मिरर | ४ मे २०२४
राज्यातील अनेक जिल्ह्यातील विवाहाच्या माध्यमातून नववधू अनेकांची फसवणूक करीत असल्याच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील पानटपरी चालक तरुणाची विवाहाच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. वधूकडील मंडळींना दीड लाख रुपये देऊन या तरुणाचा विवाह जुळविला होता; मात्र विवाहानंतर आठ दिवसातच नववधू न नांदता माहेरी निघून गेली, ती परत आलीच नाही. याप्रकरणी नववधू व मध्यस्थी एजंटासह चार जणांविरुद्ध शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गजेंद्र साहेबराव वाघ (वय ३५, खलाणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार २५ ऑक्टोबर २०२३ रोजी बांभोरी (ता. धरणगाव) येथील गजू पाटील यांनी विवाहाचा विषय काढत दीड लाख रुपये लागतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी एजंट शंकर याच्या माध्यमातून लीना जितेंद्र नंदागवळी (वय २६, रा. चंद्रपूर) हिच्याशी ६ नोव्हेंबर २३ रोजी अमराळे (ता. शिंदखेडा) येथे एका मंदिरावर विवाह लावून दिला. मात्र लग्नाच्या आठ दिवसानंतर लीना ही बहिणीकडे जाते असे सांगून निघून गेली, ती परत आलीच नाही.