जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२४
देशभरातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अनेक शुल्लक कारणाने गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच बेळगावमध्ये देखील एक धक्कादायक घटना घडली आहे. एका बागेतील फुले अंगणवाडीतील चिमुकल्यांनी तोडल्यामुळं रागाच्या भरात मालकानं अंगणवाडी सेविकेवर प्राणघातक हल्ला केला. यात तिचं नाक कापलं गेलं आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव जिल्ह्यातील बसुर्ते या गावात दि.१ जानेवारी सोमवारी दुपारी अंगणवाडीतील मुलांना बाहेर खेळण्यासाठी सोडले होते. खेळता खेळता एका मुलाने शेजारील घराच्या बागेतील फुले तोडली. मुलांना फुले तोडताना घरमालकाने पाहिलं. त्यानंतर तो अंगणवाडी सेविका सुगंधा मोरे (वय ५०) यांच्याकडे गेला. फुले तोडल्यावरून त्यांना जाब विचारला.
सुगंधा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आरोपीने सुंगधा यांच्या नाकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात त्यांचे नाक कापले गेले. हल्ल्यानंतर सुगंधा यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने या घटनेची माहिती काकती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनाी तात्काळ आरोपी घरमालकास अटक केली आहे.