
जळगाव मिरर | २ एप्रिल २०२६
कार खरेदीनंतर त्यावर ‘कॉम्प्लीमेंटरी टुअर पॅकेज’चे अमिष दाखवून राहुल गौतमराव साळुंखे (वय ४७, रा. रणछोडदास नगर, सिंधी कॉलनी रोड) या आर्थिक सल्लागार यांची १ लाख ४० हजारात फसवणुक केली. ही घटना १७ ते दि. १८ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. याप्रकरणी दि. ३१ मार्च रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रणछोडदास नगरात राहणारे राहुल साळुंखे हे राजलक्ष्मी फिनसॉल्व्ह नावाची विमा एजन्सी चालविण्यासह आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात. त्यांनी खरेदी केलेल्या कारवर ‘कॉम्प्लीमेंटरी टुअर पॅकेज’ जिंकल्याचा त्यांना दि. १७ एप्रिल २०२५ रोजी विन्स सिग्नेचर क्लब प्रा.लि. (ओपीसी) या कंपनीकडून कॉल आला. त्यासाठी त्यांना दि. १८ एप्रिल रोजी भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बोलविले. तेथे त्यांना टुअर पॅकेज विषयी माहिती दिली. ते पॅकेज घेण्यासाठी साळुंखे तयार झाले. त्यासाठी त्यांनी १ लाख ४० हजार रुपये नेट बँकिंगने पाठविले होते. साळुंखे यांनी दि. २२ एप्रिल २०२५ रोजी कटुंबीयांसह फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन केले. त्यासाठी त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरवर कॉल केला, मात्र कोणीही कॉल स्वीकारत नव्हते. त्यामुळे त्यांनी कंपनीचे प्रतिनिधी, मालक यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती.
राहूल साळुंखे यांनी हॉटेल बुकिंगविषयी त्यांनी विचारणा केली असता गोव्याला पोहचल्यानंतर माहिती देऊ, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी त्यांना सांगितले. मात्र त्यावर विश्वास नसल्याने त्यांनी अगोदर बुकिंगची माहिती विचारली, मात्र ती देण्यात आली नाही. तसेच दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने राहुल साळुंखे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शीतल साळवे, हेरंब कुलकर्णी, राज मोंडल, दिनेश कुमार (पत्ता समजू शकला नाही) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश जाधव करीत आहेत.





















