जळगाव मिरर / १६ नोव्हेंबर २०२२
कोरोनाचे सावट संपल्यानंतर आता सर्वच परीक्षापूर्वी प्रमाणे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आज राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं स्कॉलरशीपच्या परीक्षेची तारीख फायनल केली आहे. राज्यातील इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या दोन्ही इयत्तेच्या परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेची अधिसूचना www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे.
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले असून 15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरायचा आहे. विलंब शुल्कासह 23 डिसेंबर 2022 आणि अति विलंब शुल्कासह 31 डिसेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरु शकता, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सांगितलं आहे.