जळगाव मिरर | २९ जुलै २०२५
जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात भिल्ल समाजाच्या 3 मुलांना पट्ट्याने अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाला वाचा फोडत दोषी पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी एका पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणावरुन तक्रारदारांच्या आरोपावरुन संयशित म्हणून पकडलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करुन त्यांना परस्परांशी लैंगिक चाळे करायला लावण्याचा प्रकार जळगाव येथील चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणात बहुजन समाज पार्टीने या प्रकरणात तक्रार केली आहे.दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
एका गुन्ह्याप्रकरणात संशयावरुन ताब्यात घेतलेल्या भिल्ल समाजाच्या मुलांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करणाऱ्या आणि परस्परांशी लैंगिक चाळे करण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भिल्ल समाजाच्या तीन तरुणांना अंगावरचे कपडे काढून नग्न व्हायला सांगून एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा घाणेरडा प्रकार पोलिस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात केल्याचे म्हटले जात आहे. एका महिलेला सुद्धा अश्लील शिवीगाळ करून तिला मारहाण केल्याची तक्रार महिलेने केली आहे, असे ते म्हणाले.
आरोपींना अजून अटक का नाही?
जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, पोलिस उपनिरीक्षकांचे नाव सज्जनसिंह नार्हेडा असून या घटनेनंतर त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर संबंधित पीडित तरुणांच्या कुटुंबियांनी तसेच एकलव्य संघटनेने तक्रार केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करुन त्याची चौकशी करण्यात येत आहे. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून या तिघा तरुणांना पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर तिन्ही तरुणांना पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करत एकमेकांसोबत लैंगिक चाळे करायला भाग पाडल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपींना अजून अटक का नाही? असा सवालही आव्हाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केला आहे.
