
जळगाव मिरर | ३ फेब्रुवारी २०२५
राज्यातील समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुन्हा एकदा सिन्नर तालुक्यातील मर्हळ शिवारात समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी आल्याने महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे चाललेल्या किया कारला धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 2) सकाळी 8 च्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, संतोष मोहिते (38) हे आपल्या कारने (एमएच 14, जेए 5301) ने आपल्यासमवेत काही जणांना घेऊन नागपूरकडून सिन्नरच्या दिशेने येत होते. मर्हळ शिवारात आल्यानंतर मोहिते यांना झोप आल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची कार पुढे चाललेल्या किया कारला (एमएच 20, एफवाय 2255) जाऊन धडकली. यात मोहिते व किया कारचे चालक जयंत कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले. दोन्ही कारमध्ये असलेले राहुल साळुंखे (32), उद्धव महाजन (32), शुभम शिंदे (26), सचिन चव्हाण (38), अमोल अरोडकर (38), राहुल साटम (38) यांना सुदैवाने काहीही झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाचे पथक व वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना तत्काळ उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्ग पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.