जळगाव मिरर | ३ सप्टेंबर २०२५
आजच्या युगात तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे तितकेच मानवी मूल्ये, संस्कृती, सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलता हे देखील आवश्यक आहेत. फक्त तांत्रिक ज्ञान घेणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट राहिलेले नाही, तर तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना संस्कार आणि मूल्यांची कास धरून सर्वांगीण प्रगती साधणे महत्त्वाचे आहे. ज्ञानाच्या अथांग प्रवाहात मानवी मूल्ये आणि संस्कारांची जोड आवश्यक आहे. तेव्हाच आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
यावल तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव स्पर्धा आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जगदीश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी तर प्रमुख अतिथी ज्येष्ठ संचालक लीलाधर चौधरी, संचालक मधुकर परतणे, पर्यवेक्षक आर.एस. जावळे, ज्येष्ठ शिक्षक बी.एन. पाटील, उत्सव समिती प्रमुख एस.एम. तायडे, एम.एस. जाधव उपस्थित होते. प्रास्तविक बी.एन. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय श्रीमती पल्लवी पाटील यांनी केला.
शाळेत विविध दात्यांनी ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर मिळणाऱ्या वार्षिक व्याजातून दरवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. पाचवी ते बारावीपर्यंत शालेय परीक्षांमध्ये आणि प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे वाटप करण्यात आली. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय तसेच विविध विषयात प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षिसे वाटप करण्यात आली.
तसेच गणेशोत्सवात हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, हस्तकला, विज्ञान तक्ते व मॉडेल, भावगीत, प्रश्नमंजुषा, स्मरणशक्ती, स्लो सायकलींग, गोणपाट उड्या, लिंबूचमचा शर्यत, उलट चालणे, संगीत खुर्ची अशा विविध स्पर्धांसोबतच फन फेअर हा मनोरंजनाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.
विद्यार्थी भविष्याचा वेध या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा तंत्रसाधनांचा वेगाने वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी याचा सकारात्मक उपयोग करून नवे ज्ञान मिळवावे, स्पर्धात्मक जगात टिकून राहावे, तंत्रज्ञानाची गाडी वेगाने धावत असताना, तिच्यासोबत संस्कारांची दिशा आणि सर्जनशीलतेचे पंख मिळाले तरच शिक्षणाचा खरा उद्देश साध्य होईल. हेच नवीन शैक्षणिक धोरणात देखील अपेक्षित आहे. म्हणून तंत्रज्ञान स्वीकारा, सोबतच मानवी मूल्ये जपा, असा संदेशच डॉ. जगदीश पाटील यांनी दिला.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शाळेतील व्यासपीठाचा जीवनाच्या विकासासाठी परिपूर्णपणे वापर करून घ्यावा, आजच्या मेहनतीतच उद्याचे सुकर भविष्य लपले आहे, म्हणून भावी आयुष्यासाठी मेहनत केली पाहिजे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन जी.एस. पाटील सर यांनी तर आभार उत्सव समिती प्रमुख एस.एम. तायडे यांनी मानले. ध्वनीक्षेपण यंत्रणा एन.जी. चौधरी यांनी तर बैठक व्यवस्था डी.बी. सरोदे, पी.एम. वानखेडे यांनी केली. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.