जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२५
कॅलिफोर्नियातील आगीने रौद्ररूप धारण केल्याने हॉलिवूडसह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या जीवनाला धक्का बसला आहे. नोरा फतेहीला जीव मुठीत घेऊन पळावं लागलं, तर पॅरिस हिल्टनसह अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचं संपूर्णपणे नुकसान झालं. या भीषण आगीमुळे लाखोंचे घरं, बंगले आणि मालमत्ता जळून खाक झाली, आणि अनेकांच्या डोक्यावर छप्पर गेले. अश्रुपूरित अशा परिस्थितीला सामोरे जात असताना, काहींना जीव वाचवण्यासाठी धावपळ करावी लागली.
कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमधील जंगलाला लागलेल्या या आगीने भयंकर रूप धारण केले. आग इतकी भीषण झाली की, 2 लाखांहून अधिक लोकांना घरं सोडून सुरक्षित ठिकाणी पळून जावं लागलं. गेल्या तीन दिवसांत 28 एकर जंगल आणि मालमत्ता जळून खाक झाली आहे, आणि आतापर्यंत 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलिवूड स्टार नोरा फतेही या ठिकाणी उपस्थित होती, आणि आगीच्या भयंकरतेचा अनुभव घेतल्यानंतर तिने या संकटाची चित्रण कॅमेरात काढली आणि त्याचा प्रसार केला. हॉलिवूड स्टार पॅरिस हिल्टन हिच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरांचं नुकसान झालं आहे. पॅरिस हिल्टनने या घटनेचा व्हिडिओ शेअर करत त्यात आपल्या घराशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितले की, घर नष्ट होणं हे खूप क्लेशदायक आहे आणि ती पूर्णपणे तुटली आहे.
हॉलिवूड हिल्समध्ये असलेल्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस आणि स्टुडिओसुद्धा आगीच्या धोक्यात आहेत. आग ज्या पाच ठिकाणी आटोक्याबाहेर गेली आहे, त्यामध्ये स्थिती गंभीर आहे. काही ठिकाणी मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.