जळगाव मिरर | ५ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतांना एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नाशिक शहरात पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून, तिला कुकरच्या झाकणाने मारहाण करून तिची हत्या केली आहे. यामध्ये सविता गोरे या विवाहीत महिलेचा मृत्यू झाला असून संपूर्ण शहर हादरलं आहे. पत्नीची हत्या करून तिचा पती फरार झाला होता, मात्र गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून पती-पत्नीमध्ये वाद व्हायचे. त्याच रागाच्या भरात छत्रगुण गोरे या पतीने पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यामुळे परिसरात मोठी दहशत माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हत्येची ही घटना घडली. नाशिकच्या गंगापूर परिसरातील स्वस्तिक निवास सोसायटीतील फ्लॅटमध्ये सविता गोरे आणि छत्रगुण गोरे हे भाड्याने रहायचे. मंगवरी गोरे यांचा मुलगा कामावर गेल्यानंतर सविता आणि छत्रगुण हे दोघेच घरी होते. मुलीने प्रेमविवाह केल्याने गोरे दांपत्यामध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होते. मंगळवारी मुलगा कामावर गेल्यावर त्या दोघांमध्ये पुन्हा याच कारणावरून वाद झाला.
मात्र बघता बघता ते भांडण वाढलं, वाद टोकाला गेला. संतापलेल्या छत्रगुण याने रागाच्या भरात सविता यांच्यावर कोयत्याने हल्ला चढवला, तसेच कुकरच्या झाकणाने त्यांना मारहाणही केली. यामुळे त्या गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून भेदरलेल्या छत्रगुण यांनी घटनाश्थलावरून लागलीच पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गंगापूर पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी पंचनामा केला. आरोपी पतीविरोधात गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. अथक तपासाअंती अखेर पोलिसांनी आरोपी पतीला अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.