जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२५
राज्यात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना एक खळबळजनक प्रकरण आता समोर आले आहे. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने तसेच तिच्या प्रियकराने संपवले आहे. पतीला दारू पाजून चाकू खुपसून हे निर्घृण कृत्य करण्यात आले आहे. या घटनेने मालाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पतीच्या हत्येनंतर या महिलेने दिशाभूल करण्यासाठी अचंबित करणारा बनाव केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा चाकू खुपसून खून केला आहे. हा खून करण्यासाठी पत्नीने आपल्या पतीला अगोदर दारू पाजली. त्यानंतर खून करून आरोपी पत्नीने प्रियकराला सोबत घेत पती हरवल्याची तक्रार करायला पोलीस ठाण्यात पोहोचली होती. मात्र पोलीस ठाण्यात या महिलेचे बिंग फुटले.
पतीचा खून करून महिला आपल्या प्रियकरासोबत पोलीस ठाण्यात गेली होती. माझे पती हरवले आहेत, अशी तक्रार ही महिला करत होती. मात्र तक्रार दाखल करताना आरोपी पत्नी आणि प्रियकरावर पोलिांना संशय झाला. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करून केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पतीची हत्या करणारा प्रियकर आणि पत्नी यांना अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार पूजा असे आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला मालाड मालवणी परिसरात राठौडी गावात राजेश चौहान या तिच्या पतीसोबत राहात होती. या दोघांना दहा वर्षाची मुलगी आणि आठ वर्षाचा मुलगा आहे. हे देघाही आपल्या आपल्या मुलांसोबत राहायचे. या दाम्पत्याच्या घराशेजारी इमरान मन्सुरी नावाचा व्यक्ती राहायचा. या इमरानसोबत नंतर पत्नी पूजाची ओळख झाली. हे दोघेही नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पूजाने राजेश चौहान यांच्या हत्येचा कट रचला. राजेश चौहान यांना दारू पाजून चाकूने त्यांची हत्या करण्यात आली. पूजाने आपल्याच राहत्या घरात प्रियकराला सोबत घेत हे निर्घृण कृत्य केले. त्यानंतर या दोन्ही आरोपींनी राजेश चौहान यांचा मृतदेह जंगलात फेकून दिला.
मृतदेह फेकून दिल्यानंतर या दोघांनी राजेश चौहान हरवल्याचा बनाव रचला. तसेच पोलिसात तक्रार द्यायला गेले. मात्र सत्य समजल्यानंतर या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.