
जळगाव मिरर | २० जानेवारी २०२४
जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या तरूणाने आईला फोन करून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत निकेतन समाधान पाटील (वय ३३) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे निकेतन पाटील हा आईसोबत वास्तव्याला होता. गुरूवारी १८ जानेवारी रोजी निकेतनची आई ही मजूरीसाठी गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने दुपारी आईला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या परिसरात त्याची आत्या राहते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आत्याने घरी धाव घेतली. तोपर्यंत निकेतनने आपली जीवनयात्रा संपविली होती.
सायंकाळी ७ वाजता निकेतनची आई घरी आल्यानंतर त्यांनी मनहेलवनारा आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. तालुका पोलीसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई आणि लहानभाऊ रितेश असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.