जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२५
आज सर्वत्र बहिण-भावांचा रक्षाबंधन हा सण उत्साहात सुरु असतांना एक धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील वडणेर दुमाला गावात यंदा काळ्याकुट्ट छायेत साजरा झाला. बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षांचा आयुष भगत याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या नऊ वर्षांच्या बहिणीने भावाच्या थंड हातावर राखी बांधली आणि अश्रूंनी निरोप दिला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून संपूर्ण गाव गहिवरून गेला.
शुक्रवारी रात्री आयुष घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला उचलून नेले. काही वेळातच गावकऱ्यांना त्याचा मृतदेह आढळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, मात्र नियतीने त्यांना कायमचे वेगळे केले. अंत्यसंस्कारापूर्वी बहिण श्रेया भगतने भावाच्या हातावर राखी बांधली, आणि डोळ्यातील अश्रू पुसत भावाला शेवटचा निरोप दिला. या क्षणाने उपस्थित सर्वांची मने पिळवटून टाकली. रक्षाबंधनाचा सण या कुटुंबासाठी आणि गावासाठी आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनून राहिला आहे.
आयुषची आठवण आणि बहिणीने बांधलेली राखी गावकऱ्यांच्या मनात कायमची कोरली गेली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर गावात भीतीचं सावट पसरलं आहे. वनविभागाने बिबट्याचा शोध सुरू केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
