जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
देशातील छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील खल्लारी विधानसभेत भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने कार्यकर्त्याला अर्ध्या मिशा आणि अर्धे मुंडन करावे लागले आहे. निवडणुकीपूर्वी या कार्यकर्त्याने भाजप उमेदवार हरल्यास मिशा आणि केस काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे प्रकरण सध्या व्हायरल होत आहे.
४८ वर्षीय देहराम यादव हे खल्लारी विधानसभा क्षेत्रातील बिहाझर गावात राहतात. देहराम इलेक्ट्रिशियनचे काम करतात. त्यांना राजकारणाचीही आवड आहे. भाजपचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून निवडणुकीपूर्वी त्यांनी खल्लारी विधानसभेचे भाजप उमेदवार अलका चंद्राकर यांच्या बाजूने प्रचारही केला. प्रचार करताना त्यांनी भाजपचा जाहीरनामा लोकांना सांगून मोदींची गॅरंटी सांगितली. पण काही लोकांनी मोदींच्या गॅरंटीशिवाय आणखी गॅरंटी मागितली असता त्यांनी चंद्राकर जिंकल्या नाहीत तर अर्धी मिशी आणि अर्धे केस उडवून देऊ, असे आश्वासन दिले होते.
३ डिसेंबरला लागलेल्या निकालात काँग्रेसचे उमेदवार द्वारकाधीश यादव यांनी भाजप उमेदवार अलका चंद्राकर यांचा ३७११९ मतांनी पराभव केला. त्यामुळे दिलेल्या हमीप्रमाणे देहरामने त्याच्या अर्ध्या मिशा आणि अर्धे केस काढले आहेत. अर्ध्या मिशा आणि अर्ध्या केसांचा देहरामचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.