जळगाव मिरर / १९ एप्रिल २०२३ ।
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होत असून, दिवसाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी जळगाव शहरात यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त ४२.४ अंशाची नोंद झाली आहे. मंगळवारी केवळ दुपारीच नाही तर, सायंकाळी ६ वाजेपर्यंतदेखील उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना हैराण केले.
उत्तर-पश्चिमेकडून जळगावच्या दिशेने उष्ण व कोरडे वारे सक्रिय झाल्यामुळे आता जळगावकरांना खऱ्या अर्थाने उन्हाळा अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी संपूर्ण राज्यात चंद्रपूर व गोंदिया खालोखाल जळगाव शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, कोरडे व उष्ण वाऱ्यांचे प्रमाण येत्या आठवडाभरात वाढण्याची शक्यता खात्याकडून हवामान वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहराच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. दिवसा तर तापमानाचा कहरच आहे. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंतदेखील घराबाहेर निघाल्यावर उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.
