जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२४
माहेरून वेळोवेळी पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन लहानग्या लेकरांसमवेत शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे घडली. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांत पतीसह सासू व दीर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी मुळाणे असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. तिचे वडील चंद्रकांत नारायण पूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अश्विनीचा विवाह अर्जुन सुदाम मुळाणे (रा. खतवड, ता. दिंडोरी) यांच्याबरोबर १६ मे २०१२ रोजी झाला. सासरच्यांनी पहिले ३ वर्षे अश्विनीला व्यवस्थित नांदवले. तद्नंतर माहेरून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकण्यात आला. त्रास सुरूच राहिल्याने अखेर अश्विनीच्या वडिलांनी पैसे देण्याचे कबूल करत तिला त्रास देऊ नका, अशी विनवणी केली. त्यानंतर वाद नको म्हणून पतीने अश्विनीसह पिंपळगाव बसवंत येथे संसार थाटला. मात्र, सासरच्यांनी अश्विनीचे मन वळवून तिला परत खतवडला आणले. काही दिवसांनंतर सासरच्यांनी पुन्हा तिला त्रास देऊन पैशांची मागणी केली. वारंवार होणाऱ्या छळामुळे कंटाळलेल्या अश्विनीने अखेर शुक्रवारी सिद्धेश (९) व विराज (६) या आपल्या दोन चिमुकल्यांसह राहत्या घराच्या शेततळ्यात उडी मारून जीवनयात्रा संपवली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पूरकर यांच्या फिर्यादीनंतर पती अर्जुन मुळाणे, सासू हिराबाई सुदाम मुळाणे व दीर प्रमोद सुदाम मुळाणे या तिघांविरोधात दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास लोंढे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साहेबराव वडजे तपास करीत आहेत.
आठ लाख दिलेत, तरी..!
२०१८ मध्ये अश्विनीला सासू, नवरा व दीर यांनी शिवीगाळ व मारहाण केली. याबाबत अश्विनीने माहेरच्यांना माहिती दिली. त्या वेळी तिच्या वडिलांनी सासरच्यांना ५ लाख रुपये रोख दिले. काही दिवस सारे काही ठीक चालले. मात्र, आणखी ५ लाखांसाठी अश्विनीचा छळ सुरू झाला. अखेर तिच्या वडिलांनी ३ लाख रुपये अश्विनीच्या सासरच्यांना दिले. तरीही आणखी दोन लाखांसाठी अश्विनीचा छळ सुरूच राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे