
जळगाव मिरर | १३ एप्रिल २०२६
सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील निमड्यालगत सायबुपाडा परिसरात आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उकलले असून, पतीनेच गळा आवळून खून केल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरुद्ध रावेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सूत्रांनी पोलिस दिलेल्या माहितीनुसार, लालू शरद पावरा (२५, सायबुपाडा, निमड्या) या महिलेचा मृतदेह ४ एप्रिल रोजी डोंगरदरीतील झाडाजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी ५ एप्रिल रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मृत्यू संशयास्पद असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनेलमार्फत शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.
दरम्यान, पोलीस पाटील रमजान अहमद तडवी यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला असता, मृत महिलेचा पती शरद मिरलाल पावरा (रा. सायबुपाडा) याने गुन्ह्याची कबुली दिली.
५ एप्रिल रोजी पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तिचा पाठलाग करून डोंगरदरीत गळा आवळून खून केल्याचे त्याने सांगितले. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाला बांधून आत्महत्येसारखा प्रकार भासविण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिस पाटील तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत बीएनएस कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून अटक प्रक्रिया सुरू आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार मनोज महाजन याबाबतचा पुढील तपास करीत आहेत.





















