जळगाव मिरर | २ एप्रिल २०२५
१ एप्रिल पासून आर्थिक वर्षाची सुरुवात झाली असून एका कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल २०० कोटी रूपयांची झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांदी झाली. बॉसने कर्मचाऱ्यांना थेट चारचाकी गाड्या भेट म्हणून दिल्या आहेत. गुजरातमधील ज्वेलर कंपनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. के के ज्वेल्स कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्याला कार भेट दिली आहे, त्याची गुजरातमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील एका ज्वेलर कंपनीने यंदा २०० कोटी रुपयांचे वार्षिक लक्ष्य पूर्ण केले, त्यामुळे खूश झालेल्या मालकाने कर्मचाऱ्यांना महागड्या चारचाकी गाड्या भेट दिल्या. २००६ मध्ये येथील दोन भावांनी काबरा ज्वेल्सची सुरुवात केली, त्यांनी कंपनीचे नाव के के ज्वेल्स (K K Jewels) ठेवले होते. पहिल्या वर्षी कंपनीमध्ये फक्त १२ लोक काम करत होते. पहिल्या वर्षी कंपनीची उलाढाल फक्त दोन कोटी रुपये होते. आता कंपनीने २०० कोटींची उलाढाल केली, त्यानंतर दोन्ही भावांनी खूश होऊन कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट दिलेय.
कैलाश काबरा यांनी २००६ मध्ये अवघ्या २१ वर्षी बिझनेस उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या मदतीला भावाचा सपोर्ट होताच. सुरूवातीला १२ कर्मचारी अन् दोन कोटींची उलाढाल अशी त्यांनी सुरूवात केली. कैलाश काबरा म्हणाले की, आम्ही फक्त दोन कोटींच्या उलाढालीसह कंपनी सुरूवात केली होती. आज आमच्या कंपनीमध्ये १४० कर्मचारी काम करतात, यंदा आम्ही विक्रीचा विक्रम मोडलाय. आम्ही पहिल्यांदाच २०० कोटी रूपयांचा टप्पा पार केलाय. आमच्या टीमच्या मेहनतीशिवाय हे शक्य नाही.. त्यामुळेच त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कंपनीच्या पहिल्या १२ कर्मचाऱ्यांना कार भेट म्हणून दिल्या. काबरा ज्वेल्स ही आयपीओमध्ये सूचीबद्ध कंपनी आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीची उलाढाल 170 कोटी रुपये होती.
२००६ पासून सोबत असणाऱ्या १२ कर्मचाऱ्यांना कैलाश काबरा यांनी महागड्या कार गिफ्ट म्हणून दिल्या. महिंद्रा XUV 700, टोयोटा इनोवा, हुंडई i10, हुंडई एक्स्टर, मारुती सुझुकी अर्टिगा आणि मारुती सुझुकी ब्रेझा या गाड्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून दिल्या आहेत. सूरतमधील हिरे व्यपारी सावजी ढोलकिया यांच्याकडून आम्हाला कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याचा कल्पना सूचली, असे कैलाश काबरा यांनी सांगितले. सावजी ढोलकिया हे कर्मचाऱ्यांना दिवळी बोनस म्हणून महागड्या कार, दुचाकी आणि दागिने भेटवस्तू म्हणून देण्यासाठी ओळखले जातात. दरम्यान, काबरा यांची कंपनी अहमदाबादमध्ये 7 शोरूम चालवत आहे. गुजरातमधील विविध शहरांमध्ये आणखी स्टोअर्स उघडण्याची योजना आखत आहे. कंपनीने तीन महिन्यांपूर्वी यशस्वीपणे आपला आयपीओ लाँच केला होता.
