जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून जळगाव एसीबीने लाचखोरीबाबत लावण्यात येत असलेले सर्वच सापळे यशस्वी होत असून गेल्या तीन दिवसापूर्वी जळगाव मनपातील लाचखोर लिपिकासह एकाला ताब्यात घेतल्याची घटना भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन सहा फौजदार आणि एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी रंगेहात पकडले. तक्रारदाराविरुद्ध खामगाव न्यायालय, जिल्हा बुलढाणा येथे धनादेश अनादरणा प्रकरणी कलम 138 अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. सदर वॉरंट अंमलात आणू नये व मुदतवाढ मिळावी यासाठी सहा फौजदार बाळकृष्ण मुकुंदा पाटील (55) आणि आत्माराम सुधाम भालेराव (57) यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने याबाबत 21 ऑगस्ट रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. पडताळणीदरम्यान आरोपींनी दोन हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला असता सहा फौजदार पाटील यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम ठाणसिंग प्रतापसिंग जेठवे (42, रा. शिपूर कन्हाळा, ता. भुसावळ) याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपये स्वीकारले. त्या क्षणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने कारवाई करून सर्व तिघांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पार पडली. सापळा कारवाईत पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, चालक, पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस नाईक बाळु मराठे, तसेच पोलीस शिपाई प्रदीप पोळ, भुषण पाटील आणि प्रणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला.