जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२६
शहराच्या राजकारणात अनेक नेते आले, गेले; काही काळापुरते झळकले आणि काळाच्या ओघात विस्मरणात गेले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एक नाव सातत्याने जनतेच्या चर्चेत राहिले आहे आणि जळगावकरांच्या मनात पक्के स्थान निर्माण केले आहे. ते नाव म्हणजे आमदार सुरेश दामू भोळे – जळगावकरांचे लाडके ‘राजू मामा’.
निवडणूक आली कीच मतदारसंघात दिसणाऱ्या नेत्यांच्या गर्दीत राजू मामांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बारा महिने, चोवीस तास जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख केवळ राजकीय न राहता भावनिक नात्यात बदलली आहे.
राजू मामांच्या लोकप्रियतेचे खरे गमक त्यांच्या साधेपणात आणि माणुसकीच्या वागणुकीत आहे. प्रोटोकॉल, औपचारिकता किंवा दुरावलेपणापेक्षा ते थेट जनतेत मिसळणे पसंत करतात. विवाहसोहळा असो, धार्मिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कुटुंबावर आलेले दुःख – मामांची उपस्थिती हमखास दिसते. “नेता नव्हे, आपलाच माणूस” अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण होण्यामागे हीच शैली कारणीभूत ठरली आहे.
राजू मामांचा जनसंपर्क कोणत्याही एका वर्गापुरता मर्यादित नाही. लहान मुलांशी मनमोकळ्या गप्पा, तरुणांच्या अपेक्षा आणि प्रश्नांवर चर्चा, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेणे – प्रत्येकाशी त्यांचा थेट ‘वन-टू-वन’ संवाद असतो. मतदारसंघात अशा प्रकारे सर्व वयोगटांशी नातं जपणारा नेता दुर्मिळ असल्याचे मत अनेक जण व्यक्त करतात.
आज अनेक नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीय सहाय्यकांची साखळी पार करावी लागते. मात्र, सुरेश भोळे यांचा फोन थेट नागरिकांसाठी उपलब्ध असतो. कोणत्याही वेळी आलेला फोन ते स्वतः उचलतात आणि समस्येच्या निराकरणासाठी तत्काळ हालचाल करतात. त्यामुळे “माझा आमदार माझ्यासाठी नेहमी उपलब्ध आहे” ही भावना जळगावकरांच्या मनात अधिक घट्ट झाली आहे. अलीकडील लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये जळगाव शहरातून भाजपाला मिळालेले मोठे मताधिक्य हे केवळ आकड्यांचे यश नाही, तर राजू मामांच्या जनसंपर्काचे प्रतिबिंब असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. मतदारांशी निर्माण झालेले भावनिक नातेच या यशामागील खरे बळ ठरले.
आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना, सुरेश भोळे यांच्या मजबूत जनसंपर्कामुळे भाजपासाठी ही निवडणूक तुलनेने अनुकूल ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे आणि वैयक्तिक गाठीभेटींच्या जोरावर ‘राजू मामा’ हा घटक पुन्हा एकदा निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.




















