जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
राज्यातील नागपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच गोंदिया जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एका तीन वर्षीय वयाच्या चिमुकलीच्या हत्ये प्रकरणी तिची आई व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दोघांना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकारातील संशयित आरोपीचे नाव गुनिता ताराचंद चामलाटे (वय 29) रा. नांदा, लोनखैरी तर तिचा प्रियकर राजपाल मालवीय (वय 32) राहणार देवास आणि मृत चिमुकलीचे नाव मानसी चामलाटे असे आहे.
सविस्तर वृत्त असे कि, न्यू गोंदिया जिल्ह्यात राहणारी गुनिता नागपूर जिल्ह्यातील नांदा परिसरात कामासाठी आली होती. याचवेळी देवास येथील राजपाल याच्याशी तिचे सूत जमले. आई दिसायला सुंदर असताना मानसी मात्र थोडी सावळी होती. त्यामुळे तिचा अडसर दूर करण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जाते. गुनिता व राजपाल यांनी तिला 26 डिसेंबर रोजी नांदा लोनखैरी येथील घरात जबर मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. मात्र आपले बिंग उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी पती ताराचंद चामलाटे यांच्या घरी गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे मुलीला नेले. पती आणि दुसरी पत्नी यांना मानसी पडल्याने तिच्या डोक्याला दुखापत झाली व तिचा मृत्यू झाल्याची बतावणी केली.
तिचा मृतदेह पुरण्यात आल्यानंतर मात्र पती आणि त्याच्या पत्नीला संशय आल्याने त्यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली. एसडीएम गोंदिया यांनी चिमुकल्या मानसीचा मृतदेह खोदण्याचे आदेश दिले. पोस्टमार्टममध्ये या मुलीच्या डोक्यावर, शरीरावर गंभीर जखमा असल्याने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. याबाबतीत संशयावरून गुणिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने आपण आपल्या प्रियकराच्या मदतीने मानसीचा खून केल्याची कबुली दिली. अखेर गोंदिया पोलीसांनी खापरखेडा पोलिसांकडे हा तपास सोपविला व हत्येचा गुन्हा दाखल करीत वनिता व प्रियकर राजपाल या दोघांना अटक करण्यात आली.
