जळगाव मिरर | २८ जानेवारी २०२६
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते मा. अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनाने महाराष्ट्राने एक कणखर, अनुभवी आणि विकासाभिमुख नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या शोक संदेशात म्हणतात की,अजितदादा पवार यांचे निधन ही अत्यंत धक्कादायक, वेदनादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे. वक्तशीरपणा, निर्णयक्षमता आणि प्रशासनावरची मजबूत पकड यासाठी ते ओळखले जात होते. सभागृहातील शिस्तबद्ध वर्तन, सर्वसामान्यांबद्दलची आपुलकी आणि राज्याच्या विकासासाठी असलेली तळमळ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायी भाव होता.
विरोधकांनाही आदराने वागवणारे अशी ओळख असलेले अजितदादा हे बारामतीचे किल्लेदार म्हणून केवळ आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत होते. राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणि दिलेले योगदान कायम स्मरणात राहील, असेही पाटील यांनी नमूद केले.
या दुःखद घटनेमुळे पवार कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले. दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना आणि त्यांच्या असंख्य समर्थकांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




















