जळगाव मिरर | ८ फेब्रुवारी २०२५
चारचाकी वाहनाचे टायर फुटल्याने कार समोरुन येणाऱ्या दुचाकीवर आदळली. या अपघातात दुचाकीस्वार करण विजय जंजाळे (वय २४ रा. आंबेडकर नगर, साकळी ता. यावल) हा तरुण ठार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी अंकलेश्वर बऱ्हाणपुर राज्यमार्गावरील वडोदा गावाजवळ घडली. दुचाकीस्वार हा नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी डिझेल आणण्यासाठी जात होता. मात्र वाटेतच दुर्देवी काळाने त्याच्यावर झडप घातली. या घटनेची गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर चोपडा रस्त्यावर वडोदा गावाजवळ असलेल्या पुलावरुन करण जंजाळे हा तरुण (एमएच १९, डीक्यू १७०९) क्रमांकाच्या दुचाकीने यावल कडे येत होता. तर यावल कडून चोपड्याकडे जाणाऱ्या (एमएच १९ एपी. ३२७३) क्रमांकाची कार जात होती. पुलावर कारचे टायर फुटल्याने कार समोरुन येत असलेल्या दुचाकीवर आदळली. या अपघातात तरुण दुचाकीसह पुलावरुन खाली नाल्यात कोसळला. यावेळी दुचाकीने हॅन्डल हे तरुणाच्या डाव्या बाजूला खुपसले गेल्याने तो जागीच जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह घेवून यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. धडक दिल्यानंतर अपघातानंतर कार चालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मिलींद जंजाळे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात कार चालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.