जळगाव मिरर | २६ जून २०२४
सततची नापीकी आणि कर्जबाजारातून कंटाळलेल्या जळके येथील संभाजी कडुबा पाटील (वय ५०, रा. जळके, ता. जळगाव) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांना सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी याठिकाणी मनहेलावणारा आक्रोश केला.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील जळके गावात संभाजी पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्यास होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. शेतातील सततची नापीकी आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. याच कारणावरुन दि. १९ जून रोजी संभाजी पाटील यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना सोमवारी २४ जून रोजी रात्री १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे