जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३
छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर निरंकारी पेट्रोल पंपाजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेकासह एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात २० ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदनापूर तालुक्यातील निकळक गावातील रहिवासी ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय ३८ वर्ष ) युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय १३ वर्ष) आत्माराम कारभारी मस्के (वय ३० वर्ष) यांचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे. एकाच गावातील तिघांचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर साबळे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास ते मुलगा युवराज साबळे आणि आत्माराम साबळे यांना घेऊन दुचाकीवरून गावी परतत होते.
दरम्यान, दुचाकी हे दुचाकीवरून गावी परतत होते. यावेळी जालना-संभाजीनगर रोडवरील निरंकारी पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांची दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.