
जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२३ | गावठी कट्टा घेवून गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या प्रकाश सुभाष धुंदे (रा. नाडगाव ता. बोदवड) याला नाहटा चौफुली येथून ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता, त्याने हा कट्टा भुसावळातील तौसिफ असलम तडवी (रा. अयान कॉलनी) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना गावठी कट्टा बाळगलेला संशयित नाहाटा चौफुलीवर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानूसार पथकातील पोलिस हवालदार सुरज पाटील व पोलीस नाईक संकेत झांबरे यांनी नाहटा चौफुलीजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या प्रकाश धुंदे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार रुपयांचे गावठी पिस्टल, दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस, दुचाकी व मोबाईल असा ऐवज जप्त केला. त्याने हा कट्टा भुसावळातीलच तौसिफ तडवी याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे