जळगाव मिरर | २२ जानेवारी २०२५
तालुक्यातील नांद्रा खुर्द येथे दि.२० रोजी घरासमोर खेळत असलेला आठ महिन्याचा देवांशू सुनिल सोनवणे हा चिमुकला शेकोटीमध्ये पडून गंभीररित्या भाजला गेला होता. त्याच्यावर उपचार सुरु असतांना नऊ दिवसानंतर त्या चिमुकल्याची प्राणज्योत मालवल्याची घटना घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा खुर्द येथील सुनील सोनवणे वास्तव्यास असून ते पत्नीसह शेती काम करतात. आठ महिन्यांपूर्वी त्यांना देवांशू हा मुलगा झाला होता. दि. ११ जानेवारी रोजी घरासमोर शेकोटी पेटविलेली असताना तेथे काही जण बसले होते. त्या वेळी देवांशू वॉकरमध्ये खेळत-खेळत तिकडे गेला व त्याचा तोल जाऊन थेट पेटत्या शेकोटीत पडला. त्या वेळी त्याच्या चेहऱ्यापासून ते पोटापर्यंतचा भाग गंभीररित्या भाजला गेला. तसेच पायालाही इजा झाली होती. त्या वेळी घरात असलेल्या आई-वडिलांनी तेथे धाव घेत बालकाला बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते.
दि. ११ जानेवारी रोजी गंभीररित्या भाजल्या गेलेल्या देवांशूवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर नऊ दिवसानंतर दि. २० जानेवारी रोजी या बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
परिवाराला जबर धक्का
सुनील सोनवणे यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्या दाम्पत्याला देवांशू हा एकुलता एक मुलगा होता. देवांशू झाल्यापासून घरात मोठा आनंदाचे वातावरण होते. मात्र दुर्देवी काळाने घातलेल्या झडपेत गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय पोटचा चिमुरडा गेल्याने सोनवणे दाम्पत्याला मोठा धक्का बसला आहे. नांद्रा खुर्दचे माजी सरपंच वासुदेव सोनवणे यांचा देवांशू हा पुतण्या होता.