जळगाव मिरर | संदीप महाले
जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यंदाही जळगावकर जनतेने महायुतीच्या हाती शहराची सत्ता सोपवली आहे. निकालानंतर आता मनपामध्ये महापौरपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या पार्श्वभूमीवर शहरात विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक निकालानंतर जळगावकरांमध्ये एक सूर स्पष्टपणे ऐकू येत आहे. यंदा केवळ भाषणबाजी करणारा किंवा दिखाऊपणावर भर देणारा महापौर नको, तर प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारा, शहरातील मूलभूत समस्या ओळखणारा आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारा व्यक्ती महापौरपदी असावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि शहराचा नियोजनबद्ध विकास या विषयांवर ठोस काम करणारे नेतृत्व जळगावकरांना हवे आहे. निवडणुकीत महायुतीला दिलेल्या जनादेशामागेही विकासकामांची अपेक्षा असल्याचे नागरिकांचे मत आहे.
महायुतीतील नेत्यांमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी जनतेच्या अपेक्षा लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी आता शहरभरून पुढे येत आहे. महापौर निवडीचा निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो, यावर पुढील काळात मनपातील कारभाराची दिशा ठरणार असल्याने जळगावकरांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
‘खास’ म्हणून महापौर पद देऊ नका!
महापौर पद हे केवळ शोभेचे नसून, शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाणारे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. त्यामुळे हे पद कोणत्याही मंत्र्याचा किंवा आमदाराचा ‘खास’ व्यक्ती म्हणून न देता, ज्या व्यक्तीला शहरातील मूलभूत प्रश्नांची सखोल जाण आहे, अशाच व्यक्तीकडे सोपवावे, अशी जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासासारख्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा, नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा आणि निर्णयक्षमता असलेला व्यक्ती महापौर असावा, अशी जळगावकरांची अपेक्षा आहे. महापौरपद हे केवळ राजकीय समतोल साधण्यासाठी किंवा कुणाला सेटल करण्यासाठी न वापरता, जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत कार्यक्षम, संवेदनशील आणि शहराशी नाळ जुळलेले नेतृत्व देण्यात यावे, असा सूर आता दबक्या आवाजात का होईना, पण ठामपणे व्यक्त होत आहे.




















