
जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२३
कौटुंबिक कलहातून घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या दाम्पत्यातील पत्नीने पतीशी अबोला धरल्याने संतापलेल्या पतीने तिला ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे, माझ्यासोबत बोल,’ असे सांगितले; परंतु पत्नीने त्याच्याशी बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या संशयित पतीने पत्नीसह तिच्यासोबतच्या अन्य तिघींवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यानंतर संशयिताने स्वतःलाही भोसकून घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत चारही महिला जखमी झाल्या असून, हल्लेखोर पतीविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ओझर येथील चौरे मळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. १९) नृत्याची स्पर्धा बघून परतत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लीना शुभम गोतरणे, तिची काकू सोनाली वाघ, चुलत बहीण राधिका वाघ व योगिता वाघ यांना लीनाचा पती शुभम शिवाजी गोतरणे याने रस्त्यात अचानक अडविले. यावेळी त्याने त्याला लीना सोबत बोलायचे असल्याचे सांगितले.
मात्र, तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या शुभमने तीक्ष्ण हत्याराने लीनावर हल्ला केला, तसेच तिच्यासोबत असलेल्या तिच्या बहिणींवर व काकूवर सपासप वार करीत त्यांनाही जखमी केले. शुभमने याच संतापाच्या भरात त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याराने स्वतःच्या छातीतही भोसकून घेतले. यावेळी रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या चारही महिलांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, तर शुभम यालाही दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात जखमी महिलांची प्रकृती स्थिर असून, हल्लेखोर शुभम गोतरणे याचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, लीना गोतरणे हिच्या तक्रारीवरून संशयित शुभम गोतरणे याच्याविरोधात ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र कोल्हे करीत आहेत.