जळगाव मिरर | १४ फेब्रुवारी २०२४
पारोळा येथील कजगाव रस्त्यावरील वाकडा पुलाखाली एका ३५ ते ४० वर्षीय अज्ञात महिलेने स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची घटना १३ रोजी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा पोलिसांनी या महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. १३ रोजी दुपारी ४.४५ वाजता जवळपास ३५ ते ४० वर्षीय एक महिलेने एका बिसलरी बाटली पेट्रोल भरून आणले होते. त्यानंतर वाकड्या – पुलाजवळील भोसले पोल्ट्री फार्मच्या शेजारी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून व दगडावर बसून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. त्यांच्या अंगावर लाल वेगवेगळे ठिपके असलेली रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र, पायात चप्पल अशी सुशिक्षित घरातील महिला असल्याचे प्रथमदर्शीनी दिसून आले.
याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पवार करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका चालक ईश्वर बाबा ठाकूर, आशुतोष शेलार यांनी मृत महिलेस कुटीर रुग्णालयात दाखल केले. तर पोलीस उपनिरीक्षक सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे, किशोर भोई व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून महिलेने आणलेली पेट्रोलची बाटली तसेच कपड्याचे नमुने व चप्पल ताब्यात घेतली आहे.