जळगाव मिरर | ९ जानेवारी २०२४
” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव असून सुद्धा आज बरेच मुले -मुली अडचणींवर मात करून विविध क्षेत्रात उच्च पदांवर सेवेत आहेत तर अनेक जण उद्योग,व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आहेत आज संवेदना फाउंडेशन तर्फे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड. सौ रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील इयत्ता दहावी बारावीतील गुणवंतांच्या सत्कारासह सेवाभावी संस्था आणि निराधार पाल्यांचा केलेला सत्कार हा सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी राहील. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मना-मनामध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांना अधिक प्रगती साधणे सहज शक्य होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहून अधिक जिद्दीने, चिकाटीने परिश्रम करून अपेक्षित यश साध्य करावे आणि आई-वडिलांचे नाव रोशन करावे ” असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे केले.
ते ॲड. रोहिणीताई खडसे यांच्या संवेदना फाउंडेशन तर्फे येथील गोदावरी मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित इयत्ता दहावी – बारावीच्या गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षीय पदावरून बोलत होते. यावेळी ईश्वरभाऊ रहाणे, यु डी पाटील, निवृत्ती पाटील, विनोदभाऊ तराळ,सोपानभाऊ पाटील,सुधीर तराळ,रमेश खाचणे,नितीन कांडेलकर,राजु माळी,निलेश पाटील,प्रमोद धामोडे प्रवीण कांडेलकर,भागवत पाटील महबूब भाई, मुन्नाभाऊ बोंडे आदींसह विविध शाळांचे मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार खडसे यांनी सर्व गुणवंतांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, संवेदना फाउंडेशनतर्फे मतदार संघातील गुणवंतांच्या गौरवाची सुरू असलेली परंपरा निश्चितच अभिनंदनीय आहे यावर्षी प्रथमताच गुणवंतांसोबत सेवाभावी संस्थांचा आणि निराधार पाल्यांचा आईसोबत केलेला गौरव हा खऱ्या अर्थाने रोहिणीताईंच्या सामाजिक बांधिलकीची जपणूक करणारा आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी प्रेरणादायी असते. अलीकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले असून या स्पर्धा परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक दोन प्रयत्नातील अपयशाने खचून न जाता यश मिळेपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला आ.खडसेंनी दिला.
त्याआधी प्रास्ताविकातून ॲड. सौ. रोहिणीताई खडसे यांनी यशस्वी मुलामुलींच्या कौतुकासोबतच त्यांच्या पालकांचेही विशेष अभिनंदन केले. प्रत्येक पालक कष्ट घेऊन, मेहनतीने पैसा कमावून मुलांच्या भवितव्यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण कसे मिळेल? यासाठी प्रयत्नशील असतो.फक्त शिक्षणचं एकमेव साधन असे आहे की, त्यातूनच व्यक्तीचा विकास होऊन त्याच्या जीवनात परिवर्तन घडू शकते म्हणूनच अशा गुणी विद्यार्थ्यांच्या उज्वल कार्याला साथ देण्याचा हा संवेदना फाउंडेशनच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न असल्याचे ॲड. खडसेंनी स्पष्ट केले. यापुढेही गौरवाची ही परंपरा कायम चालू राहील सोबत मतदार संघातील ज्या मुला मुलींचे छत्र हरवले आहे अशा निराधार मुला-मुलींसह मातांना तसेच सेवाभावी सामाजिक संस्थांना ही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात मतदारसंघातील सुमारे 300शालेय गुणवंत विद्यार्थ्यांना, 22 निराधार पल्यांना आणि आठ सेवाभावी संस्थांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस बी साळवे, रंजना महाजन योगिता पाटील यांनी केले.