जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२३
राज्यातील अनेक शहरातील गुन्हेगारी नित्याची झाली असतांना छत्रपती संभाजी नगरातून एक घटना समोर आली आहे. औरंगाबाद नाक्यावर शनिवारी दुपारी दत्ता काकाजी जिवरग (वय २३) हा तरुण चहा प्यायला उतरल्यानंतर एका तरुणाची नऊ लाखांची रोख रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लांबविली.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता जिवरग हे भुसार मालाचे व्यापारी आहेत. मका खरेदीचे पैसे शेतकऱ्याला देण्यासाठी देवगिरी बँकेतून त्यांनी नऊ लाख रुपये काढले. यानंतर ते औरंगाबाद नाक्यावरील एका हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबले. पाठीमागून त्यांचा मक्याने भरलेला ट्रक येणार होता तसेच त्यांना हमालाला पैसे द्यायचे होते. तोपर्यंत ते चहा पित इतर व्यापाऱ्यांशी गप्पा मारत बसले. हमाल आल्यावर जिवरग कारकडे गेले. तेव्हा त्यांना कार बंद झाली नसल्याचे आढळले. त्यांनी आत बघितले असता, बॅग गायब झाल्याचे दिसले. या बॅगमध्ये तीन कोरे व एक सही केलेला धनादेशही होता. चहा पिण्यासाठी थांबले असताना दत्ता जिवरग यांनी ‘रिमोट की’ने कारचे सेंट्रल लॉक केले. मात्र, सेन्सर खराब असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही व गाडीचे दरवाजे लॉकच झाले नाहीत. याचा फायदा घेत चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली.