जळगाव मिरर | १३ फेब्रुवारी २०२६
शहरातील नवीन जोशी कॉलनीत मोबाईल स्विच ऑफ करीत घराच्या दुसऱ्या मजल्यावर मोहीत किरण जोशी (वय २५) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन जोशी कॉलनीत मोहीत जोशी हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास होता. त्याच्या वडीलांची एमआयडीसी परिसरात चटईची फॅक्टरी असल्याने मोहीत हा वडीलांना व्यवसायात मदत करीत होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास मोहीत हा घराच्या वरच्या मजल्यावर गेला होता. सायंकाळी उशिरापर्यंत देखील तो खाली न आल्याने त्याची आई त्याला बोलविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. दरवाजा ठोठावून देखील तो प्रतिसाद देत नव्हता. यावेळी परिसरातील नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला असता, मोहीत हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
मोहीतला तात्काळ परिसरातील नागरिकांनी खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मोहीतला मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोहीतयाचे महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण झाले होते. त्याच्या वडीलांची चटईची कंपनी असल्याने मोहीत हा वडीलांना व्यावसायात हातभार लावित होता. त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, काका, भाऊ असा परिवार आहे.




















