
जळगाव मिरर | १३ मार्च २०२६
शहरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १८ वर्षीय तरुणीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती घालून तिचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरात राहणारी १८ वर्षीय पीडित तरुणी आणि संशयित आरोपी हुजेफा युनुस पिंजारी (वय १९, रा. चाळीसगाव रोड, धुळे) यांची ओळख होती. १९ नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ही घटना घडली. संशयित आरोपीने पीडित तरुणीचे काही खासगी अश्लील व्हिडिओ मोबाईलमध्ये मिळवले होते. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेवर दबाव निर्माण केला.
दिलेल्या तक्रारीनुसार, बाथरूममधील पीडितेचे अश्लील व्हिडिओ चित्रित करण्यात आले होते. “तू मला नाही म्हटली, तर तुझे व्हिडिओ व्हायरल करीन” अशी वारंवार धमकी देऊन आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, आरोपीने तिला तिचे नग्न फोटो पाठवण्यासाठीही जबरदस्ती केली. या सततच्या मानसिक त्रासामुळे आणि बदनामीच्या भीतीमुळे पीडित तरुणी प्रचंड दडपणाखाली होती. अखेर पीडितेने हिंमत दाखवून जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले आणि आपबिती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणाचे गांभीर्य ओळखून संशयित आरोपी हुजेफा पिंजारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहे.




















