जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मोठ्या चर्चेत आले असतांना आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. याशिवाय बच्चू कडू यांनी अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यासाठी बंद राहायला राहिली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमासोबत संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले की, “यवतमाळमध्ये जी यात्रा काढली जाणार आहे, त्याचे आमंत्रण राज ठाकरेंना दिले. तिथे त्यांनी यावं आणि शेतकऱ्यांना संबोधित करावं. तसेच आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यांसाठी बंद राहायला हवी. किमान काही तास मुंबईने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं. कारण ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि या देशाच्या राजधानीतूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा या अपेक्षा राज ठाकरेंकडून आहेत.”
“शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागण्या यावर राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विचारमंथन करण्यात आले. शेतकरी हा विषय एका पक्षाचा नाही, एका जातीधर्माचा नाही. शेतकरी सर्व जातीधर्माचा आहे. त्यामुळे मनसे यात पुढे आली तर निश्चितच शेतकरी आंदोलनाला बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नाही. मरणारा शेतकरी वाचवायचा आहे, ” असेही बच्चू कडूंनी सांगितले.
“देवेंद्र फडणवीस म्हणतात की दुष्काळ पडला तर मग आपण कर्जमाफीचा विचार करु. त्यामुळे आता दुष्काळ पडायची वाटच पाहिली जात आहे का, असा प्रश्न आता पडला आहे. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला भाव दिला जात नाही, हे त्यापेक्षा जास्त नुकसानकारक आहे. मागील दोन वर्षांपासून भाव दिला जात नाही, त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे फडणवीसांच्या लक्षात आलं पाहिजे,” असेही बच्चू कडूंनी म्हटले.
