जळगाव मिरर | १८ फेब्रुवारी २०२४
धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाऱ्यांच्या गाडीला धडक देत व त्यांनतर तीघांवर हल्ला चढवून डोळ्यात मिरचीची पुड फेकून तब्बल १ कोटी ६० लाखांची रोकड अज्ञात चोरट्यांनी जबरीने लुटून पोबारा केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान घडली. सिनेस्टाईलच्या थरारा प्रमाणे घडलेल्या या घटनेने जिल्हयात खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंगचे पेमेंट जळगावहून पिंप्रीला जाण्यासाठी कारमधून नेले जात होते. निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली गाडी येताच स्क्रॉपीओ कारमधून आलेल्या तिघांनी पैसे असलेल्या गाडी अडवून अवघ्या काही मिनिटात पैसे लुटून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस तसेच एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहचले.
दुर्गेशच्या संबंधित व्यक्तींनी दिलेल्या माहिती नुसार निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाच्या खाली त्यांची क्रेटा कार येताच समोरून बोलेरो कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. त्यामुळे क्रेटा कारचे टायर पंचर झाले. त्यानंतर चोरट्यांनी स्क्रॉरपीओमधून उतरत थेट क्रेटा कारवर हल्ला चढवला. कारमध्ये अकाउंट योगेश पाटील, कामगार दीपक महाजन, ड्रायवर उमेश पाटील हे तिघं जण बसलेले होते. अवघ्या काही कळण्याच्या आधीच त्यांनी डोळ्यात मिरची पुड फेकत १ कोटी ६० लाखांची रोकड असलेली बॅग घेऊन जळगावच्या दिशेने पळ काढला. विशेष म्हणजे चोरट्यांनी आणलेली स्क्रॉर्पीओ कार तिथंच सोडून पळ काढला आहे. कारमध्ये तलवार, लाठीकाठी तसेच पिस्तुल सापडल्याचे देखील कळते. तसेच चोरटे तीनहून अधिक असून कारण गाडी सोडून पळ काढल्यामुळे पुढे त्यांना घेण्यासाठी कुणी तरी थांबले असल्याचे बोलले जात आहे.
चोरट्यांनी कॅश असलेल्या गाडीचा आधी अपघात केला. त्यानंतर क्रेटा गाडीच्या काचा फोडत तीन जणांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्यांना तलवार बंदुकीचा धाक दाखवून कॅश आपल्या ताब्यात हस्तगत केली व तिथून दुसऱ्या गाडीने पळ काढला असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे.